#माझी_भ्रमंती_माझा_पहिला_हिमालयन_ट्रेक - भाग १
पूर्वार्ध: तयारी, भारत - पाक तणाव आणि पुणे ते कसोल
एखादी आवडणारी गोष्ट पहिल्यांदा करायची असेल तेव्हा त्याबद्दल उत्सुकता आणि उत्कंठा असते. त्यासाठी करावी लागणारी तयारी करण्यात खूप मजा येते. तयारी पूर्ण केल्यानंतर कधी एकदा ती गोष्ट आपल्याकडून पूर्ण होतेय, ह्याची आस लागून राहते. म्हणूनच म्हणतात ना
*पहिलं ते पहिलं असतं, ज्यासाठी आपण स्वतःला पूर्णपणे वाहिलेलं असतं*
असच काहीतरी माझ्या बाबतीत झालं. हिमालयीन ट्रेक करायचा खूप वर्षापासून मनात होतं पण योग येत नव्हता. ह्यावर्षी तो आला. गेल्या नऊ वर्षापासून बऱ्यापैकी आपल्या सर्वांचा आवडता सह्याद्री तिन्ही ऋतूमध्ये फिरून झाला होता(आणि पुढेही चालूच राहणार). ज्यामध्ये मन अडकून होते. त्यातले गडकिल्ले, घाटवाटा, डोंगर रांगा फिरून झाल्या होत्या. त्यातच दर शनिवार - रविवारची सिंहगड वारी, दर महिन्याची कात्रज ते सिंहगड वारी मुळे हिमालयीन ट्रेक करू शकतो ह्याचा विश्वास होता. बऱ्याच जणांनी करण्याचा सल्ला सुद्धा दिला होता. त्यामुळे ह्यावर्षी करायचे मनाने निश्चित केले. गुगल वर शोधाशोध केल्यावर मार्च मध्ये हिमाचल प्रदेशातील *पार्वती व्हॅली मधील सारपास ट्रेक* पक्का केला ज्यासाठी मे महिना अनुकूल होता.
ट्रेक कोणता करायचा पक्का झाल्यावर पहिल्यांदा जाणार असल्यामुळे त्यासाठी सराव चालू केला. सकाळचे रोज १०- १५ की मी धावणे, पाठीवर ओझे घेऊन किल्ले सिंहगड दोन वेळा चढून उतरणे इत्यादी इत्यादी. हे करताना बरेच मित्र सांगत होते, तुझ्याकडून सहज होऊन जाईल. सह्याद्रीचा अनुभव पाठीशी असल्यामुळे मलाही तसा विश्वास होता, पण पहिला हिमालयीन ट्रेक आणि त्याची उत्सुकता त्यामुळे सराव पाहिजेच होता.
जो ट्रेक करायचा ठरला त्या सारपास ट्रेक विषयी:
सार पास ट्रेक हा भारतातील हिमाचल प्रदेशातील एक लोकप्रिय, मध्यम ते कठीण प्रकारात मोडणारा ट्रेक आहे, जो कसोलपासून सुरू होतो आणि बार्शैनी(पुलगा) येथे संपतो . हा ट्रेक नवशिक्यांसाठी अनुकूल मानला जातो आणि त्यात जंगले, मोठी मोठी झाडे, डोंगर आणि बर्फाच्छादित पर्वतांसह विविध भूप्रदेश आहेत. एप्रिल-मे ह्या वेळेत चालू असणारा आणि बरेच जण करणारा हा सर्वोत्तम असा ट्रेक. सुमारे १४००० फूट(४२०० मीटर) उंची असणारा आणि ४८ किलोमीटरचा(खरा तर ३० च जेव्हा आम्ही वेगवेगळ्या app मधून चेक केले तेव्हा आहे दिसले) हा ट्रेक साधारणपणे ५ दिवस आणि ४ रात्रींमध्ये पूर्ण होतो ज्याचे नियोजन खालीलप्रमाणे असते.
दिवस १: कसोल ते ग्रहण गाव.(८.५ की मी)
दिवस २: ग्रहण ते मिनथाच. (६ की मी)
दिवस ३: मिंथाच ते नगारु (५ की मी)
दिवस ४: नगारु ते समिट(high point) ते बिस्केरी थाच. ( ५ की मी)
दिवस ५: बिस्केरी थाच ते बर्शैनी(पुलगा) (६ की मी).
**************************
*आतंकवादी हमला, भारत - पाक युद्धजन्य परिस्थिती आणि जाण्याचा धाडसी निर्णय*
दिनांक २६ मार्च २०२५ ह्याच दिवशी हिमालयीन ट्रेक करायचे निश्चित झाले आणि तसे आमच्या व्हॉट्सअँप ग्रुप वर पोस्ट केले. अतिमतः नऊ जण ट्रेक साठी तयार झाले. ट्रेकच्या तारखा सुद्धा निशित होऊन १२ मे ते १६ मे ह्या तारखांवर मोहोर उमटवली. १० मे ला पुणे ते शिर्डी, शिर्डी ते दिल्ली आणि तिथून दिल्ली ते कसोल ११ मे ला पोचायचे आणि १९ मे ला परत. जाण्याचे(शिर्डी ते दिल्ली विमान, दिल्ली ते कसोल बस) आणि येण्याचे(दिल्ली ते पुणे रेल्वे) तिकिटं काढून ठेवली. पण दुर्दैवाने माशी शिंकली आणि जायचे निश्चित केल्यानंतर एक महिन्याने म्हणजे २४ एप्रिलला पहेलगाम मध्ये आतंकी हमला होऊन त्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला. त्यानंतर पंधरा दिवसांनी ७ मे ला भारतीय लष्कराने पाक पुरस्कृत आतंकी ठिकाणी हल्ले केले आणि भारत - पाक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान ह्या ठिकाणी त्याचा खूप परिणाम झाला. विमानसेवा बंद करण्यात आली. आमचे जायचे कॅन्सल होतेय की काय अशी वेळ आली. नऊ जणांपैकी सहा जणांनी यायचे टाळले. राहिलेले दोघे आणि मी मात्र जायचे ठरवले. निर्णय तसा धाडसीच होता आणि आम्ही तो घेतला. तसेच आमचे विमान शिर्डी वरून होते आणि तिथून विमानसेवा चालू होती त्यामुळे साईबाबांचे नाव घेतले आणि जायचे पक्के केले.
सर्व तयारी झाली. सराव चालूच होता जो जायच्या एक आठवडा बंद केला. ट्रेकला लागणाऱ्या सर्व गोष्टी, साहित्य अगोदरच जमा घेऊन ठेवले होते. लागणारी सर्व कपडे विकत घेतली. ट्रेकिंग बूट, ट्रेकिंग पोल, जॅकेट इत्यादी सर्व गोष्टी घेतल्या. युद्ध चालू असतानाच दोन दिवस अगोदर खाण्याच्या पदार्थ पण आणले. हे सर्व करत असताना विमान सेवा चालू आहे ना ह्याकडेही लक्ष होते कारण खूप विमाने कॅन्सल झाली होती त्यामुळे धाकधुक होती जी ९ तारखेपर्यंत होती. सर्व पॅकिंग झाले होते आणि फक्त बॅग उचलून निघायचे राहिले होते. अखेर तो दिवस म्हणजेच १० मे उजाडला आणि सकाळी पाचलाच उठून आवरून स्वारगेट गाठले. तिथून मेट्रो ने नाशिक फाटा आणि तिथून एस टी ने शिर्डी गाठले. विमान संध्याकाळी सव्वा चारला होते जे वेळेवर आले आम्ही शिर्डीतून दिल्लीला प्रस्थान केले. दिल्लीत पाऊल ठेवताच मोबाईल चालू केला आणि त्यावर पहिली बातमी कळली ती म्हणजे युद्ध थांबल्याची आणि सुटकेचा निःश्वास सोडला. त्या अवस्थेत आमचा रात्री नऊ वाजता गरम वातावरणातील दिल्ली ते कसोल, ह्या बस ने थंड अशा कसोलच्या दिशेने प्रवास चालू झाला जो ११ तारखेला सकाळी सातला पोचून संपला.
क्रमशः
(भाग २ - ट्रेक अनुभव लवकरच)
संदिप डावरे
9890995551
Comments
Post a Comment